नवनाथ योगेश्वरांचे उगमस्थान उत्तर हिंदुस्थान सांगितले जात असले तरी त्यांची समाधिस्थाने दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात नाथपंथी स्थाने बरीच आहेत. ह्या स्थानांपैकी काही महत्वाची स्थाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
१. कानिफनाथ गड – मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवनी समाधी आहे. हे नाथपंथाचे एक जागृत स्थान असून ऐतिहासिक आहे. ह्या विषयीचा उल्लेख ‘श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ’ जो ‘गोरक्षकिमयागिरी’ ह्या मूळ ग्रंथाचा अनुवाद आहे, ह्यात आलेला आहे. ह्या ग्रंथातच (श्री नवनाथ भक्तिसार) श्री कानिफनाथांनी मढी येथे १० व्या शतकात समाधी घेतली असा उल्लेख आला असून ह्या कानिफनाथांनाच कान्होबा ह्या नावाने संबोधले जाते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
श्री कानिफनाथ-कान्होबा हे नाथपंथातील श्रेष्ठ आचार्य आहेत. त्यांनी सुमारे ८७ ग्रंथांची रचना केले असून त्यापैकी १७ ग्रंथ पाली माध्यमातून लिहिलेले उपलब्ध आहेत. अशा नवनाथांपैकी एका प्रबुद्ध नारायणाची समाधी मढी येथे आहे. मढी हे नाव मठी ह्या शब्दाचे अपभ्रंशित रूप आहे.
चैतन्य कानिफनाथांची समाधी एका टेकडीवरच उंचावर आहे. आज तीन बाजूंनी ह्या मंदिरात जावयास दरवाजे आहेत. पूर्व बाजूने गावातून जावयास मुख्य दरवाजा आहे. दुसरा उत्तर बाजूला दुय्यम दरवाजा आहे. तिसरा पश्चिमेस छोटा दरवाजा आहे. ह्या तिन्ही दरवाजाजवळ जावयास पायऱ्या आहेत.
पूर्व दरवाजाला जोडूनच दोन समाध्या आहेत त्या चैतन्य कानिफनाथांच्या शिष्य वर्गाच्या आहेत असे म्हणतात.
मुख्य-समाधी मंदिर भव्य आहे. पुढे डाळिंबीचे झाड वृंदावनावर असून पत्र्याचा मंडप आहे. नंतर आत सभा मंडप साधारणतः २५ फूट × २५ फूट असून तीन फूट उंचीवर, आतल्या बाजूस समाधीचा सुमारे १४ फूट × १४ फुटांचा गाभारा आहे व मध्यभागी समाधी आहे.
गाभाऱ्यात येण्यासाठी पूर्व बाजूस एक छोटा दरवाजा आहे व दुसरा दरवाजा दक्षिणेस आहे. पण ह्या गाभाऱ्यात यावयास पायऱ्या नाहीत. तसेच सभा मंडपाला सोडून नाथांचे शेजघर दक्षिण बाजूस असून उत्तरेकडून छोटा दरवाजा आहे. सभामंडपासही दोन दरवाजे भव्य कमानीचे आहेत. एक पूर्वेकडून व दुसरा उत्तरेकडून आहे. सभा मंडपाच्या उत्तर बाजूच्या दरवाजासमोर वृंदावन असून तिथेही एका साधकाची समाधी आहे. त्याच्या शेजारी दुसरी एका साधकाची समाधी आहे.
आत सभामंडपात शेजघराच्यासमोर ४ फूट × ६ फुटाचा ओटा असून मध्यभागी चौरस दगडी चबुतरा आहे व ह्या चबुतऱ्याच्या चारही बाजूंनी नागाच्या फणीची नक्षी सुबक पद्धतीने कोरलेली आहे व वर छत्रीचे छत आहे. दोन दगडी खांबांवर ही छत्री उभी आहे.
समाधी मंदिराच्या दक्षिण दरवाज्यासमोर मच्छिन्द्रनाथांच्या पादुका आहेत व मंदिराच्या पाठीमागे विठ्ठल मंदिर आहे. हे खरे साधना मंदिर आहे. ह्या मंदिरास तळघर असून तेथे समाधीसाधनेसाठी १४ × १४ फुटांची चौरस अशी जागा खास बांधलेली आहे. ह्या समाधी मंदिराचा दरवाजा पश्चिमेस असुन दरवाजा समोर मोठी खिडकी आहे. त्यातून प्रकाश व हवा येत असते. ह्या तळ मजल्याची बांधणीही दगडाची सुबक अशी आहे. त्यामुळे थंडगार वाटून मानसिक शांती सहज प्राप्त होते.
पश्चिमेच्या दरवाज्याजवळ एक २५×२५ फुटांचा चौरस ओटा आहे. तेथे बांधकाम अर्धवट पडलेले आहे. ह्या चौरस ओट्यासमोर १९७५ साली ‘श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टने’ सुंदर बाग केली होती. ओट्याच्या पाठीमागेही बाग केली आहे. पूर्व दरवाजावरच ‘नगारखाना’ असून तोहि भारदस्त आहे.
मंदिरातील शिलालेख
ह्या कानिफनाथांच्या समाधी मंदिराला मी ऐतिहासिक म्हटले आहे त्याचे कारण ह्या मंदिरात काही शिलालेख आहेत. सभामंडपात मधोमध एक शिलालेख आहे. हा शिलालेख पांच ओळीत असून आजुबाजूला चारीबाजूनी चांदीची कोंदणी आहे. आता त्यातील चांदी काढून नेलेली आहे.
शिलालेख – १
१॥चीमाजी सावतः भः।। २॥क्ती नीरंतरःनी ते नमः।। ३॥ स्कारः शी होसनीः ।। ४॥ तुझे गा पाडलः मस्तका उपरी।। ५॥ द्वारका नगरी ठाव मजः।।
शिलालेख – २
सभामंडपातून गाभाऱ्यात जाताना पूर्व दरवाज्यासमोर जोत्यावर हा दोन ओळींचा शिलालेख आहे.
१॥श्री चरनी दृढभाव ।। २॥पीलाजी गायकवाड ।।
शिलालेख – ३
हा तिसरा शिलालेख सभामंडपासमोरील वृंदावनाचा जो ओटा आहे त्यावर आहे. ह्या वृंदावनात डाळिंबाचे झाड आहे. म्हणून ह्या ओट्याला डाळिंबीचा ओटा म्हणतात हा शिलालेख जरा वेगळ्याच धर्तीने लिहिला आहे. त्यामुळे तो वाचताना दोन भाग करून वाचले तरच ते योग्य वाटतात.
(१) श्री नृपशा ॥ मठि द्वारका तेथे मा(१) (२) ली वान सः ॥ झा, सषः तयाचे चर(२) (३) के १६५२ सा.। णी लक्ष माझी पील(३) (४) धारण ना। जी गायकवाडः चीम (४) (५) म संवतस। जी भगत सावत।।ः।।(५) (६)रे।।ः।।०।।।
आता पहिल्या भागाचा विचार केला असता हा शिलालेख असा वाचता येईल.
‘श्री नृप शाली वाहन शके १६५२ साधारण नाम संवत्सरे’:
व दुसरा भाग अशा तऱ्हेने वाचता येईल-
“मठी द्वारका तेथे माझा सखा। तयाचे चरणी लक्ष माझे। पिलाजी गायकवाड। चिमाजी भगत सावत।
चौथा शिलालेख अशाच आशयाचा तळमजल्यावरील भुयारातील खिडकीवर आहे. पण तो अवघड ठिकाणी असल्याने ठसे घेणे जरा अवघड काम आहे. तरीपण त्याचा ठसा पूर्ण घेऊन तोही वाचकांपुढे मांडू; पण त्यांतही पिलाजी गायकवाड व चिमाजी सावतचीच नावे आहेत.‘गौतमी’ बारवेतील शिलालेख
ह्या समाधी मंदिराच्या पायथ्याशी पश्चिमेस दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेली मोठी भव्य एक चिरेबंदी विहीर आहे. ह्या विहिरीचे नांव ‘गौतमी’ आहे. असे त्या विहिरीत असलेल्या त्या दोन शिलालेखांवरून स्पष्ट होते. एक शिला लेख उत्तर मुखी असून दुसरा दक्षिण मुखी आहे.
उत्तर मुखी शिला लेख –
१॥ गौतमि आणष्ठा ॐ॥ १ २॥ यान सव कुटी चौथार॥ २ ३ ॥ तया होयेः औसिया ती ।। ३ ४॥ – यीचिथोरी आणका॥ ४ ५ ॥ श्रि हरि हरा पाहे चिमाजी॥५
दक्षिणमुखी शिलालेख –
॥ अस्ती श्री कृष्ण परमात्मा शिव पूजा ॥ ॥ नागीरी द्वारका मठीः । कुवे सागुरु ॥ ॥ प्रहामाही तीर्थ नाम गौतमी ( स्वामी ) गुरु ।। ।। सागः नित्य श्री पिलाजी गायकवाड ॥ड व चिमाजी सावत श्री पुनजी ।। । खमवित मढी नः शके १६५५ ।। ॥स्वाथी नाम सवत चैत्र मघा॥
वरील सर्व शिलालेखांचा अभ्यास केला असता असे स्पष्ट होते की, देवनागरीतील शिलालेख हे बांधकाम चालू असतानाच बसविलेले आहेत. त्यामुळे त्यांना चौकट केलेली दिसून येते व सुटसुटीत व अक्षरे उठावदार आहेत. आज ३५० वर्षे झाली तरी ती स्पष्ट आहेत.
मराठी देवनागरीतील शिलालेखावरून असे स्पष्ट होते की ह्या मंदिराचे बांधकाम करण्यात मराठे सरदार पिलाजी गायकवाड व चिमाजी सावंत यांचे मार्गदर्शन झाले आहे व त्यांच्या पुढारीपणामुळेच हे बांधकाम झालेले आहे.
डाळिंबीच्या ओट्यावरील शिलालेखावरून असे स्पष्ट होते की-ह्या मंदिराचे काम सरदार पिलाजी गायकवाड व चिमाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शालिवाहन शके १६५२ मध्ये पूर्ण झालेले आहे.
२. गौतमी बारव – गौतम विहिरीवरील शिलालेखावरून हीच गोष्ट स्पष्ट होते की ही विहीर बांधकाम पूर्ण झाल्यावर चिरेबंद दगडात पूर्ण बांधली गेली आहे. त्या शिलालेखावरही चिमाजी सावंत व पिलाजी गायकवाड यांचा उल्लेख आला असून विहिरीचे बांधकाम शके १६५५ मध्ये पूर्ण झालेले आहे. म्हणजे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर तीन वर्षांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.
गौतमी बारव ही भक्तांच्या स्नानासाठी व बागेसाठी बांधलेली असावी कारण शिलालेखात ‘कुवे सागरु प्रहामाही तीर्थ’ असा गौतमीचा गौरव केलेला आहे.
ऐतिहासिक कथा :
मढी येथील सर्व शिलालेखांचा अभ्यास केला असता अशी एक कथा सांगितली जाते की, महाराणी येसूबाईंनी युवराज-राजे शाहू दिल्ली बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना ह्या कान्होबाच्या (कानिफनाथ ) समाधीला नवस केला की, जर माझ्या राज्याला छत्र वंशाला दिवा राहिला तर तुझ्या समाधीवर छत्र बांधीन व तुझ्या समाधीसमोर सतत दिवा तेवत ठेवीन. ह्या नवसानंतर पंधरा दिवसातच राजे शाहूंची सुटका झाली.
पुढे राजे शाहू छत्रपती झाल्यावर ह्या मंदिराच्या कामाची आखणी झाली व ह्या मंदिराच्या उभारणीचे काम सरदार पिलाजी गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी हे काम-चिमाजी सावंत ह्या त्यांच्या खास सुभेदारास निवडुंगे येथे ठेवून करवून घेतले.
ह्या कथेच्या आधाराने शिलालेखाचा खरा बोध होतो व शाहूछत्रपतींनी ह्या मंदिराला दिलेल्या सनदेचे महत्त्व पटते.
बोलके शिलालेख ह्या कानिफनाथांच्या मंदिरातील सर्व शिलालेख देवनागरीतील बोलके आहेत. मंदिरातील शिलालेखावरून व गौतमी विहीरीवरील शिलालेखावरून ह्या मढ़ी क्षेत्राचे वर्णन एक तीर्थक्षेत्र असे करण्यांत आले आहे. हे तीर्थक्षेत्र द्वारकानगरीसारखे श्रेष्ठ असून प्रहामही तीर्थ आहे.लेख ज्या दरवाजाच्यावर कोरलेला आहे त्या इमारतीचे ‘करेक्टर’ ‘साधना मंदिर’ म्हणून आहे. त्या इमारतीत एक तळघर आहे व तेथे समाधी साधनेची सोय केलेली आहे. तळघरात जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा जीना आहे. तळमजल्याच्या १४×१४ फुटांच्या जागेत १।।×१।। फुटाचे होमकुंड आहे. अग्निसाक्ष साधनेची ही नाथांचीच जागा आहे. धुनी इथेच पेटवली जात असली पाहिजे.
समाधीसमोर तुळशी वृंदावन
हिंदू समाधीला वृंदावन म्हणतात त्यामुळे साधारणतः अशा समाधीसमोर वृंदावन असणारच. नाथपंथाच्या जिथे अशा जिवंत संजीवनी समाधी असतील तिथे समाधीसमोर तुळशी वृंदावन हे आढळणारच. त्याप्रमाणे चैतन्य कानिफनाथांच्या समाधीसमोर तुळशीवृंदावन भव्य आहे, त्यातच डाळींबी लावलेली आहे. दुसरे वृंदावन डावीकडे आहे.
खालील उल्लेख श्री. मिरीकरांच्या लेखात आला आहे:-
“डाळींबीच्या ह्या ओट्यास पूर्वी तुळशी वृंदावन म्हणत असत. देऊळ बांधण्याच्या वेळच्या कारखान्याच्या व खर्चाचा एक जुना कागद पहाण्यात आला. त्यात कारखाने, वृंदावने दोन सन्मुख तुळशी वृंदावन व द्वितीय वामभागा वृंदावने ज्या पुष्पवेली वैजयंती”
असा उल्लेख असून या दोन वृंदावनास एकंदर खर्च ९०७८८ आला असे म्हटले आहे.
आमच्या दृष्टीने वृंदावन बांधण्याचा आलेला उल्लेख महत्त्वाचा आहे! ‘तुळशी वृंदावन’ हे हिंदूंचे एक आदर्शाचे प्रतीक आहे.
तुळशी वृंदावने वैष्णवी साधनेची प्रतीक आहेत. नाथांची वैष्णवी साधनाच महाराष्ट्रांत नाथपंथाचा आदर्श झाली होती.
३. जती हनुमानाचे देऊळ – हे नाथांकडे येतानाच लागते. त्याच्या शेजारीच गोसाव्यांचा मठ आहे. ह्या मठाला अध्यात्मिक अर्थ असून परंपराही आहे. ह्या ब्रह्मचारी गोसाव्यांकडून अगदी पूर्वी नाथांची पूजा-अर्चा पाहिली जात असे. ह्या जती हनुमंताच्या देवळात मारुतीच्या तीन मूर्ती आहेत. मुख्य मूर्ती शनि मारुतीची आहे. दोन मूर्ती दक्षिणमुखी व एक पूर्वमुखी आहे.
एवढ्या तपशीलात जायचे कारण एवढेच की, मढी हे एक नाथपंथाचे पवित्र स्थान आहे. “श्रीकृष्ण परमात्मा शिवपूजा ॥ नागौरी द्वारका मढीः” व गौतमि आणष्ठा ॐ॥ हे शिलालेख ह्या नाथपंथीय वैष्णवी शैवाची तीर्थक्षेत्राची ग्वाही देत आहेत.
यात्रेत येणाऱ्या चौदा पगड जातींचा समुदाय नाथांच्या भक्तीचे प्रतीक आहे. त्यात नाथांच्या चरणी भक्तिभावान लीन झालेले छत्रपती शाहू महाराज, मराठे सरदार कान्होजी आंग्रे, मराठे सरदार पिलाजी गायकवाड, चिमाजी सावंत यांची नावे इतिहासाच्या स्मरणात राहिली आहेत.
जय सद्गुरु कानिफनाथ महाराज!
संदर्भ – सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ यांच्या अलख निरंजन दीपावली विशेषांक १९७५ मधून