श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट

।। ॐ चैतन्य सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ।।
शिवयाग यज्ञ

शिवयाग यज्ञ

नाथपंथीयांचे दैवत श्री शंकर म्हणजेच आदिनाथ. मढीमध्ये भगवान शंकरांचे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. त्याला सिद्धेश्वर ( आपेश्वर ) म्हणतात. चैतन्य कानिफनाथ महाराज याच ठिकाणी सेवा करीत असत, अशी आख्यायिका आहे. ह्याच मंदिरात श्री देवेंद्रनाथांना आदिनाथांचा साक्षात्कार झाला. त्या मंदिरातील भगवान शंकरासमोरील नंदी कित्येक वर्ष उघड्यावर असल्याने खूप जीर्ण झाला होता. त्यामुळे महाराजांनी १९७७ मधे श्रावण अमावस्या पोळाच्या दिवशी ओटा बांधून नंदीची प्रतिष्ठापना केली. त्या वेळी आदिनाथांनी महाराजांना आशीर्वाद दिला. महाराजांना भावावस्थेत आदेश मिळाला. त्याच क्षणी बाबांनी शिवयाग यज्ञ करण्याचा संकल्प केला.

शिवयागाची सुरुवात ८ मे १९७९ वैशाख शु।। द्वितियेला झाली व पूर्णाहुती १२ मे १९७९ वैशाख पौर्णिमेला झाली. वैशाख पौर्णिमा हा चैतन्य गोरक्षनाथांचा प्रकटदिन. तो योग मुद्दाम श्री देवेंद्रनाथांनी साधला कारण एक हजार वर्षांपूर्वी असाच शिवयाग चैतन्य गोरक्षनाथांनीच परिसरात केला होता. शिवयागाचे मुख्य पुरोहित त्रंबकेश्वर येथील नाथपंथी पंडे कै. श्री. बापुजी धारणे हे होते. प्रमुख आचार्य नेपाळचे राजगुरु विद्यालंकार गोगी नरहरीनाथ तसेच यजमानपदी श्री. व सौ. चंद्रकांतदादा सुळे (महाराजांचे ज्येष्ठ बंधू) हे होते. या काळात प. पू. श्री. देवेंद्रनाथ हे चैतन्यात येणाऱ्या देवतांच्या स्वागता करीता मयूर टेकडीवर भस्म समाधी व भस्म शयैवर होते. पाच दिवस चाललेल्या ह्या यज्ञासाठी देशभरातून भक्तगण, नाथपंथी साधू, पीर, संत, महंत दाखल झाले होते. २४ ब्रह्मवृंद महारुद्र स्वाहाकार करण्यासाठी बसले होते. पाच दिवस १०८ नाथभक्त नाथ पोथीचे पारायण करत होते.

शेवटच्या दिवशी दुपारी ठिक १२.०१ मिनीटांनी श्री नरहरीनाथ, श्री देवेंद्रनाथ व श्री चंद्रकांत दादांचे चे हस्ते पूर्णाहूती झाली. त्यानंतर श्री देवेंद्रनाथांचे सुंदर प्रवचन झाले. योगी नरहरीनाथांनी परखड व झंझावाती वाणीत प्रवचन केले आणि शेवटी सांगितले, “२४ तासांच्या आत पर्जन्यवृष्टी होईल.” त्या वेळी उपस्थितांनी आभाळात पाहिले तर ते अगदी निरभ्र होते, परंतु थोड्याच वेळात भर उन्हात मेघ जमा झाले व मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तेव्हापासून जेमतेम पाऊस पडणाऱ्या मढीत चांगला पाऊस पडू लागला.

शिवयाग यज्ञाच्या कार्यक्रमात सुळे कुटुंब
शिवयाग यज्ञाच्या कार्यक्रमात सुळे कुटुंब

शिवयाग यज्ञाच्या कार्यक्रमात सुळे कुटुंब हजर होते. त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

Latest Updates

  • All Posts
  • News

05/09/2024

सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या ज्ञानाचा आणि नाथपंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री मच्छिंद्र नेहे (निरपेक्षेन्द्रनाथजी) यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा श्रावण दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक भाविकांच्या घरोघरी जावून, अनेक…

Edit Template
Scroll to Top