Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||

|| मयूर टेकडी - मढी ||

पूर्वी ह्या टेकडीवर मोर खूप असायचे त्यामुळे या टेकडीला मयूर टेकडी म्हणतात. सुरुवातीला कानिफनाथ जेव्हा पैठण वरून आले त्यावेळी ते ह्या मयूर टेकडीवर बसायचे. श्री कानिफनाथ प्रथम मढीला आले. त्यावेळी त्यांनी ह्याच टेकडीवर बसून काही दिवस साधना केली होती. योगियांची खूण योगी जाणे! त्यांना या ठिकाणी आल्यावर खूप आनंद वाटायचा.

कानिफनाथांची एक शिष्या होती तिचं नाव धोंडाबाई. ही धोंडाई कानिफनाथांना म्हणायची की ही टेकडी तुम्ही मला द्या. तेव्हा कानिफनाथ म्हणाले की नाही मी ही टेकडी दुसऱ्या कोणा करता तरी राखून ठेवली आहे.पुढे श्री देवेंद्रनाथ मढीला आल्यानंतर या मयूर टेकडीवर त्यांनी दगडामध्ये चार बाय चार फूट आकाराचे कुंड तयार केले आणि ह्या कुंडात श्री देवेंद्रनाथ प्रत्येक महिन्याला दर्शनी अमावस्येला भस्म समाधी साधना करायचे. यावेळी दगडामध्ये बांधलेल्या चौकोनी कुंडात ते गळ्यापर्यंत भस्मात बसून समाधी लावीत असत.

अशा एकूण ४२ भस्म समाधी साधना त्यांनी केल्या. भस्म समाधी साधनेमुळे आपल्याला तीनही लोकांशी संपर्क स्थापित करता येतो. भस्म समाधी अवस्थेत असतानाच श्री देवेंद्रनाथांना सामरस्य सिद्धी ही नाथपंथातील अत्यंत उच्च दर्जाची अवस्था प्राप्त झाली. त्यामुळे ही विभूती मयूर टेकडीवरील साधना कर्मानंतर भावावस्थेत खाली आपेश्वराच्या शिवमंदिरात येत असे व क्षणार्धात शिवरपिंडीवर पाय ठेऊन उभी रहात असे. भक्तांना अदिनाथाचे दर्शनच अशा वेळी घडत असे. त्यावेळचे शिवाचे भव्य दिव्य रचरूप पहाणे हे देखील डोळ्यांना सहन होत नसे इतके तेज सभोवती पसरत असे. शिंवपिंडीवर आरूढ़ होताच श्री देवेंद्रनाथांना तादात्म्य भावाने अद्वैत अवस्था प्राप्त होत असे, ही अवस्था समाप्त होताच पुन्हा ते द्वैत भावात येत, व शिवपिंडीचे भक्तीभावाने दर्शन घेत. डोळ्यातून भक्तीसर वाहू लागे व शिवपिंडीवर अश्रूच्या भक्तीरसाचा अभिषेक होत असलेला सर्वजण पहात असत.

त्यावेळची त्यांची संपूर्ण समर्पणाची दासोऽहं भावना समजून येत असे, अशाच प्रकारे एकाच ठिकाणी सोऽहं ही अवस्था व ‘दासोऽहं भाव याचा सुरेख समन्वय सर्वांनी पाहिलेला आहे! पुढे जाऊन ह्याच कुंडात श्री देवेंद्रनाथांनी १९८२ सालच्या मे महिन्यात योगमायेने महासमाधी घेतली. ही जागा श्री देवेंद्रनाथांनी पुर्वीच निश्चित केली होती. अशा प्रकारे मयूर टेकडीचा इतिहास आहे.