प. पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ हे आपल्या घरी साधना करीत असताना त्यांना स्वामींनी दृष्टांतात गुरुमंत्र दिला व साधनेचा मार्ग दाखविला.
गंधाळ ह्या राघवेंद्र स्वामींनी तपश्चर्या केलेल्या भूमीवर देवेंद्रनाथांना अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे महाराज गंधाळ येथे आले व त्यांनी ७५ दिवसांचे अनुष्ठान केले. त्यावेळेस प. पू. श्री राघवेंद्र स्वामींनी अत्यंत प्रसन्न होऊन “माघ पौर्णिमा”च्या दिवशी त्यांच्या अनुष्ठानाची सांगता होम हवनाने झाल्यावर सिध्द दैवतांच्या साक्षीने महाराजांना “देवेंद्र” असे दीक्षांत नाव दिले व शक्तीपात करुन आशिर्वाद दिला. नाथसंप्रदायाचा प्रचार, प्रसार, जीव ब्रह्म सेवा हेच तुझे या जन्मातील कार्य आहे असे सांगितले. त्याप्रमाणे सद्गुरु श्री देवेंद्रनाथ मढी येथे आले असताना चैतन्य श्री कानिफनाथांनी दर्शन देऊन त्यांना कार्याचा आदेश दिला. मढी हीच महाराजांची अध्यात्मिक कर्मभूमी झाली.
श्री देवेंद्रनाथांना श्री राघवेंद्र स्वामींनी दीक्षा दिली त्या माघ महिन्याच्या एकादशी पासून ते चतुर्दशी पर्यंत देवेंद्रनाथ महाराज मंत्रालयम् येथे येऊन स्वामींची सेवा केल्यानंतर पौणिमेला गंधाळ येथे होमहवन करुन या सेवेची सांगता करत असत.
“मी वर्षभर जी जीवब्रह्म सेवा करतो त्यासाठी मी येथे येऊन स्वामींच्या कृपेने माझी बॅटरी चार्ज करतो” (तपोबल वाढवितो) असे आपल्या शिष्यांना या मंत्रालयम् सेवे बद्दल सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज सांगत असत.
प. पू. श्री देवेंद्रनाथ महाराजांनी मंत्रालयमला राघवेंद्र स्वामींच्या सेवेला गेले असताना त्यांनी तेथे एक कठोर अनुष्ठान केले. केवळ एक वेळ एक मुठीचा भात केला. त्यातलाही एक भाग गाईला, एक भाग कुत्र्याला आणि एक भाग स्वतः ग्रहण केला. अनुष्ठानानंतर जवळच असलेल्या गांधाळ गावात श्री देवेंद्रनाथ महाराज गेले. तेथे पंचमुखी मारुती आणि महालक्ष्मीची जागृत स्थाने आहेत. श्री देवेंद्रनाथांच्या कठोर अनुष्ठानाने पंचमुखी मारुती व महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. श्री देवेंद्रनाथांना दोन्ही देवतांनी दृष्टांत देऊन आशीर्वाद दिला.