श्री देवेंद्रनाथांनी सांगितलेल्या त्रिसूत्री प्रमाणे (साधका करिता साधना, साधने मधून जीवब्रह्मसेवा आणि जीव ब्रह्म सेवेतून आत्मोद्धार) साधना करून त्यात परफेक्शन आल्यावर मग तो साधक जिवब्रह्म सेवा करू लागतो. मग काही काळाने त्याचा उद्धार होतो. म्हणजे तो जेव्हा दुसरा जन्म घेतो तेव्हा आदल्या जन्मीच्या साधनेचं जे काही बळ असेल त्या बळावर त्याला दुसरा जन्म जेव्हा मिळेल तेव्हा तो जन्म साधनेला भरपूर वेळ देणारा असा जन्म मिळतो. म्हणजे त्याला पैसा मिळविणे ही ददात राहणार नाही. तो पूर्णपणे साधने मध्ये रत राहतो. आणि जन्मोजन्मी साधने मध्ये प्रगती करून अशा ह्या साधकाला सात जन्मांचा योगी म्हणतात. आणि असा योगी पुढे चालून सिद्ध होतो.
असे श्री देवेंद्रनाथ सात जन्माचे योगी आहेत. ह्या अवस्थे नंतर त्यांना शिव सामरस्य ही सिद्धी प्राप्त होते. म्हणजे तो सिद्ध (श्री देवेंद्रनाथ) आणि शिव ह्या दोन्ही मध्ये काहीही फरक नाही. आणि हे दर्शनी दाखविण्याकरिता श्री देवेंद्रनाथ शिवाच्या पिंडीवर उजव्या पायाचा अंगठा टेकवून दुसरा आधार त्रिशुळाचा घेऊन ते उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरायचे. आणि त्या वेळेला श्री देवेंद्रनाथांचे शरीर अतिशय भव्य व्हायचे असे प्रत्यक्ष पाहणाऱ्या सर्वांचा अनुभव आहे.
अशा अवस्थेपर्यंत पोहोचून श्री देवेंद्रनाथ महाराज जीवब्रह्म सेवा करायचे. श्री देवेंद्रनाथांच्या भाषेत टोपली भर मंत्र न देता जीव ब्रह्म सेवेकरीता मोजके काही मास्टर मंत्र दिले आहेत त्या मंत्रांच्या सहाय्याने हव्या त्या इच्छित कार्याची पूर्तता होते.
दर अमावस्येला संपूर्ण नाथपंथी बाणा (वेष) धारण करून होम हवनादि कर्में झाल्यावर यौगिक क्रियांच्या साह्याने मढी येथे आलेल्या पिडित लोकाच्या हर प्रकारच्या व्याधी नष्ट करण्यासाठी जीव ब्रह्म सेवा महाराज करीत असत. ते सदेही असेपर्यंत एकही अमावस्या त्यांनी चुकविली नाही, कारण नाथांचा तो आदेशच होता. मढी येथे उपचार करुन घेण्यासाठी पिडीतांची गर्दी वाढल्यावर श्री देवेंद्रनाथांनी पुढे जाऊन जितेंद्रनाथ, ज्ञानेंद्रनाथ आणि नागेंद्रनाथ असे तीन नाथजी निर्माण करुन त्यांना सुध्दा काही अधिकार दिले. आजतागायत प्रत्येक महिन्याच्या दर्शनी अमावस्येला श्री देवेंदनाथ त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून ही जीव ब्रह्म सेवा अखंडीतपणे करीत आहेत.