Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||

|| पिठाधिपती ||

आद्य पिठाधिपती श्री देवेंद्रनाथ महाराज

कलीयुगामध्ये नाथपंथाचे महान व अलौकिक कार्य चालू आहे. कलीचा दाह कमी करण्यासाठी नाथ सिध्द कार्यरत आहेत. प. पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी १९७४ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदिनाथांच्या आदेशानुसार श्री नाथपंथी द्वैताद्वैत पीठाची प्रतिष्ठापना केली. या महान पीठाच्या छायेत त्यांचे अध्यात्मिक जीवन अधिकच विकसित झाले. ह्याच्या संबंधीत विस्तृत विवेचन आपण ह्याच संकेतस्थळावर आपण वाचले आहे. सोमवार दिनांक ३ मे १९८२ रोजी सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी योगमायेने संजीवन समाधी घेतली.

श्री जितेंद्रनाथ महाराज

श्री गंगाराम विद्ये (श्री. जितेंद्रनाथ) बालपणापासून अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. ते नित्य नियमाने नगर मधील श्री सिद्धेश्वर मंदिरातील शिवाची पूजा उपासना करीत असत. सुमारे १२ वर्षे त्यांनी सातत्याने भाद्रपद महिन्यात अष्टविनायकाची यात्रा केली. श्री मार्कंडेय मंदिर सेवा मंडळ नगर चे सचिव म्हणून कार्य करीत असताना श्री देवेंद्रनाथांनी जितेंद्र नाथांना म्हणजेच विद्येंना भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी देवेंद्रनाथ यांनी विद्ये महाराजांना मार्कंडेय मंदिराची जागा कार्यक्रम घेण्यासाठी तीन दिवसांकरिता मागितली. ती जितेंद्रनाथांची व देवेंद्रनाथांची पहिली भेट होती.

एके दिवशी श्री देवेंद्रनाथ महाराजांना चैतन्य कानिफनाथांची भावावस्था आली असताना त्यांनी “नाथजीके कार्य के लिए मुझे ज्येष्ठ शिष्य चाहिये। आप में से कोई ये जिम्मेदारी ले सकता है? मेरा शिष्य बनके नाथजी का कार्य संभालोगे?” असे विचारले. तेव्हा विद्ये हात जोडून उभे राहून म्हणाले, महाराज इस सेवा कार्य के लिए मै तैयार हुं। तेव्हा देवेंद्रनाथ भावावस्थेमध्येच म्हणाले, “देखो, नाथजी का रास्ता काटों का है। इसके उपर से तुम्हे चलना होगा। कार्य करते समय तुम्हें बहुत सारी कठीणाइयॉं उठानी पडेगी और बहुत संयम रखना पडेगा।” त्यावेळी विद्येंनी त्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यावेळी श्री देवेंद्रनाथांनी विद्येंच्या मस्तकावर कृपाशिर्वादाचा हात ठेवला.

एका अमावस्येच्या दिवशी श्री देवेंद्र नाथांनी विद्ये महाराजांना कानिफनाथांच्या समाधी मंदिरामध्ये नेऊन मंदिराची दारे बंद करून घेतले. भावावस्थेत ते कानिफनाथांच्या समाधीवर स्थानापन्न झाले आणि विद्ये महाराजांना समोर बसवून त्यांचा पूर्वजन्म व या जन्मात आलेली संकटे यातून नाथांनी त्यांना कसे वाचविले याबद्दल सविस्तर सांगितले आणि उर्वरित जीवन नाथाकार्यासाठी आहे याची जाणीव करून दिली. आणि त्यांना नाथ संप्रदायातील अनेक गुप्त मंत्र सांगून त्याचा जीव ब्रह्म सेवेसाठी उपयोग करण्याचा आदेश देवून आयुष्याचे सोने केले.

देवेंद्रनाथांनी योगमायेने संजीवन समाधी घेतल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी ज्येष्ठ शिष्य श्री. जितेंद्रनाथ (गंगारामजी विद्ये) यांच्याकडे पीठाचा वारसा आला. त्यानी सद्गुरु आदेशानुसार अध्यात्मिक कार्य केले. देवेंद्रनाथांच्या नंतर नाथ कार्याची धुरा श्री जितेंद्रनाथांनी गुरु आदेशानुसार पुढे नेटाने चालविली. आणि रविवार दिनांक ३ मे १९८८ रोजी ते चैतन्यात विलीन झाले.

श्री खगेंद्रनाथ महाराज

खगेंद्रनाथांचा दीक्षांत विधी –

रविवार दिनांक २५ ऑक्टोबर १९९८ रोजी बोल्हेगांव (अहिल्यानगर) येथे स्वामी श्री राघवेंद्र यांच्या वृंदावन मंदिराच्या पवित्र परिसरात आणि गायत्री यज्ञाच्या साक्षीने सद्गुरु श्री देवेंद्रनाथांच्या आदेशानुसार श्री खगेंद्रनाथ यांना ‘श्री नाथपंथी द्वैताद्वैत पीठाचे पीठाधीश म्हणून श्री नागेंद्रनाथ यांनी त्यांचा दीक्षांत विधी केला. हा आध्यात्मिक कार्यक्रम तीन दिवसांचा होता. पीठातील परंपरागत नाथपंथी ‘पादुका व मुगूट तसेच नाथपंथी बाणा’ यांची पूजा करण्यात आली. या सर्व वस्तू पालखीत ठेवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री देवेंद्रनाथांचे ज्येष्ठ शिष्य श्री नागेंद्रनाथ (श्री. मारुतराव फासे) यांनी श्री खगेंद्रनाथांना नाथपंथी बाणा (शैली, शूंगी,कंथा, झोळी, त्रिशूळ इत्यादी) दिला. सद्गुरु श्री देवेंद्रनाथांच्या जयघोषात मंगल वाद्यांचा गजर झाला. शंख, तुतारी यांचे निनाद झाले. पुष्पवृष्टी झाली. ‘श्री नाथपंथी द्वैताद्वैत पीठ की जय’ प.पू. सद्गुरु श्री देवेद्रनाथ महाराज की जय असा जयघोष झाला.

रचनात्मक कार्य –

श्री खगेंद्रनाथ(श्री. प्रकाश प्रधान) यांनी नाथभक्तांची व गुरुबंधूची एक चांगली संघटना बांधली आणि रचनात्मक कार्य केले. होम हवनादि विधी, सत्संग इत्यादी धार्मिक कार्यक्रम तर केलेच परंतू सद्गुरु देवेंद्रनाथांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले व त्यातूनच स्वामी राघवेंद्रतीर्थ यांच्या वृंदावनाची सुंदर वास्तू व रम्य परिसर निर्माण झाला. मयूर टेकडीवर प. पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांचे भव्य शिवपिंडीच्या आकाराचे अत्यंत आकर्षक व सुंदर समाधी मंदीराचे बांधकाम झाले.

श्री देवेंद्रनाथ चरणी लीन –

रविवार दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी नाथसंप्रदायातील अत्यंत महत्वाचा पवित्र दिवस श्री धर्मनाथ बीज या दिवशी श्री खगेंद्रनाथ आपले गुरु प. पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज यांचे चरणी लीन झाले.