जन्मतिथी – आषाढ शु. ९ (नवमी) शके १८५९
तारीख – १६ जून १९३७
जन्मस्थळ – पेण, ता. पेण, जि. रायगड
प्रहर – त्रिप्रहर
गोत्र – सांखान्
शाखा – मधान्दिनी
वडिलांचे नांव – सखाराम
आईचे नाव – सीतामाई
आजोबांचे नांव – पांडुरंग
नांव – विजयकुमार
दिक्षांत नांव – श्री देवेन्द्रनाथ
गुरु – श्री राघवेन्द्र स्वामी (मंत्रालायम)
दिक्षा गोत्र – निरंजन
नाथ कार्याचा आदेश – चैतन्य कानिफनाथ (मढी)
समाधी तिथी – वैशाख शु. ( मोहिनी) एकादशी शके १९०४
सोमवार, दि. ३ मे १९८२
समाधी स्थळ – मयूर टेकडी, श्रीक्षेत्र मढी, तालुका- पाथर्डी,
जिल्हा – अहमदनगर
प. पू. सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज उर्फ श्री. विजयकुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान सिध्दयोगी होते. त्यांचा जन्म आषाढ शुध्द नवमी शके १८५९, १६ जून १९३७ रोजी रायगड जिल्ह्यात पाली येथे झाला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले देवेंद्रनाथ महाराज हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. त्यामुळे शिस्तप्रियता, व्यवस्थितपणा त्यांना प्रिय होता. उच्चशिक्षीत असले तरी स्वभावात शालिनता होती.
मुंबईला नोकरीला असताना पाँडेचरी येथील महान योगी श्री अरविंद घोष यांचे भक्त श्री. मुखर्जी यांच्याशी त्यांचा संपर्क आला. श्री. मुखर्जीनी महाराजांना अनेक चमत्कार करुन दाखवले. त्यामुळे महाराज प्रभावित झाले. महाराजांनी मुखार्जीना आपल्याला गुरुमंत्र देण्याची विनंती केली. पण मी तुझा गुरु नसून लवकरच तुला एक महान सद्गुरु लाभणार आहेत व असे मोठे चमत्कार तू स्वतःच करुन दाखवशील असे सांगितले. आंध्रप्रदेशातील मंत्रालयम् येथील समाधीस्त श्री राघवेंद्र स्वामींनी दृष्टांत देऊन गुरुमंत्र दिला आणि दिक्षांत नाव ‘देवेंद्र’ असे ठेवले.
महाराजांच्या घरात पूर्वापार नाथपूजा व पोथी पारायणे होत असल्याने त्यांच्यावर नाथपंथाचा प्रभाव होता. एकदा ते मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनाला गेले असतांना कानिफनाथांनी प्रत्यक्ष दर्शन दिले. मी तुझी बरेच वर्षांपासून वाट पहात आहे असे सांगून या मंदिराला आलेली अवकळा व पुजेतील उणिवा सांगितल्या. तसेच तू येथे जीवब्रह्मसेवा कर असे सांगितले. महाराजांनी मढी हीच आपली कर्मभुमी आहे हे जाणले व येथेच आपले कार्य केले. चैतन्य गोरक्षनाथांच्या आदेशानुसार श्री नाथपंथी द्वैताद्वैत पिठाची स्थापना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिनांक ६ जुलै १९७४ रोजी केली व संसारिक असलेल्या आपल्या भक्तजणांना, शिष्यांना, साधकांना हटयोग शिबीरे, अलखनिरंजन या माध्यमातून जीवब्रह्मसेवा व जीवब्रह्मसेवेतून अध्यात्मिक उन्नती प्राप्त कशी करावी याचे मार्गदर्शन केले. देवेंद्रनाथ महाराज दर अमावस्येला मयुर टेकडीवर भस्म समाधी घेत असत. विश्वशांतीसाठी ८ मे ते १२ मे १९७९ साली “शिवयाग” हा महान यज्ञ त्यांनी केला.
आपल्या पूर्व नियोजित वेळेप्रमाणे या सिध्दयोग्याने योगमायेने वैशाख शुध्द मोहिनी एकादशी-सोमवार, दि. ३ मे १९८२ रोजी समाधी घेतली.
आदेश !