दिनांक 12 जुलै 2025 रोजी एक दिवसीय नवध्यान योग शिबीराचे श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टने आयोजन केले होते. श्री देवेन्द्रनाथांच्या कन्या राजश्रीताई फोडकर यांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर श्री देवेन्द्रनाथांच्या समाधीचे पूजन केल्यानंतर सत्संग घेऊन अनेक ज्येष्ठांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी शिबिराचे उद्घाटन केले. सांप्रत काळामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकरिता नाथपंथी हठयोगा एवढा प्रभावी दुसरा कोणताही मार्ग नाही. शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये योगशिक्षण व प्रात्यक्षिक आणि दुसऱ्या सत्रामध्ये साधनेची पुनरावृत्ती व साधने बद्दल विवेचन असे शिबिराचे स्वरूप होते. ह्या शिबिरामध्ये नाथपंथी हठयोगी साधना, आसन, प्राणायाम, ध्यानधारणा, नाथपंथी तत्त्वज्ञान अशा अनेक गोष्टी शिकविल्या गेल्या. नाथपंथी साधनेच्या औत्सुक्या पोटी अनेक साधक- शिष्यवर्ग ह्या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री संतोष यद्रे, श्री संदीप तारगे, श्री संतोष चौधरी, श्री प्रेमनाथ वैद्यम, श्री अभिषेक बराटे व काही गुरुबंधूंच्या नियोजन- व्यवस्थापनाने आणि सद्गुरु श्री देवेन्द्रनाथांच्या कृपेने शिबिराचा सोहळा खूपच चैतन्यमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात उत्तम प्रकारे पार पडला. हे शिबिर श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट गुरुपौर्णिमा आणि धर्मनाथाची बीज ला धरून वर्षातून दोन वेळा आयोजित करीत असते.





